मुंबई | सैफ अली खानवर मध्यरात्री चाकू हल्ला, वांद्रेतील घरात घटना

Photo of author

By Sandhya

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियांसह घरात झोपला असताना ही घटना घडली.

सैफ अली खान व करीना कपूर खान यांच्या वांद्रेतील घरात दरोडेखोर शिरला होता. त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत त्याच्या मानेला व मणक्याला दुखापत झाली आहे.

मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया
गुरुवारी रात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला, त्याने त्याच्या मोलकरणीबरोबर वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला केला. या घटनेत तो जखमी झाला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
लीलावती हॉस्पिटलमधून सैफच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली आहे. “सैफवर त्याच्या घरात अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्याला पहाटे साडेतीन वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं. त्याला सहा जखमा झाल्या आहेत, त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत,” असं लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ निरज उत्तमानी म्हणाले. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच सैफच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती देता येईल, असंही डॉ. उत्तमणी यांनी सांगितलं

Leave a Comment