
मुंबई: पगार रखडल्यानं मेटाकुटीला आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगाराच्या केवळ ५६ टक्के रक्कम देण्यात आली होती. त्याबद्दल रोष व्यक्त होत असताना उर्वरित ४४ टक्के पगारासाठी ताबडतोब १२० कोटी रुपये राज्य सरकार एसटी महामंडळाता हस्तांतरित करणार आहे. सरनाईक यांनी ही माहिती दिली.
प्रशासकीय शिष्टाचार बाजूला ठेवून परिवहन मंत्री सरनाईक यांनी आज अर्थ विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांची भेट घेतली. सचिवांनी मंत्र्यांना भेटायला जावं, अशी साधारण पद्धत आहे. पण सरनाईक यांनी तो शिष्टाचार बाजूला ठेवला आणि विजय यांच्या भेटीसाठी पोहोचले. पुढील महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारा निधी एक महिना आधीच एसटी महामंडळाला राज्य सरकार हस्तांतरित करणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.
‘महामंडळानं सरकारकडे १०७६ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १२० कोटी रुपये सरकार आता हस्तांतरित करणार आहे. तर उर्वरित रक्कम तीन टप्प्यांमध्ये महामंडळाला राज्य सरकारकडून मिळण्यात आहे,’ असं सरनाईक यांनी सांगितलं. ‘प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांना पगार दिला जाईल,’ असंही त्यांनी सांगितलं. अर्थ विभागाच्या सचिवांसोबत झालेल्या बैठकीत हे ३ महत्त्वाचे निर्णय झाल्याचं सरनाईकांनी सांगितलं. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांचे आभार मानले.
एसटी कामगारांना ५६ टक्केच पगार देण्यात येणार असल्याचं सरकारनं नुकतंच जाहीर केलं होतं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांना केवळ ५६ टक्के पगार मिळाला. निधी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार कमी झाल्याचं सांगण्यात आलं. याबद्दल एसटी कामगार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. आधीच पगार कमी, त्यात आता केवळ ५६ टक्केच रक्कम मिळाल्यानं घर कसं चालवायचं, असा प्रश्न एसटी कामगारांना पडला. यावरुन सर्वच स्तरातून टीका झाल्यावर सरकारला जाग आली.