संभाजी भिडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन ; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Photo of author

By Sandhya

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) वतीने आंदोलन करण्यात आले.

जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, सुषमा सातपुते, किशोर कांबळे, मृणाल वाणी, तन्वीर शेख, आशिष माने, गणेश नलावडे, उदय महाले आणि सर्व सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वारंवार समाजातील तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य करीत तरुणांची माथी भडकविणार्‍या संभाजी भिडे नामक व्यक्तीने पुन्हा एकदा बेताल वक्तव्ये केली आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व त्यांच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा घाणेरडा प्रकार केला आहे.

देशाच्या राष्ट्रपित्यावर अवमानकारक वक्तव्य करणार्‍या भिडेंवर गृह विभागाने तत्काळ गुन्हे दाखल करीत त्यांना अटक करावी, अशी मागणी जगताप यांनी केली. ‘राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा’

सर्वधर्मसमभाव ही भारत देशाची खरी ओळख आहे. मात्र, ही ओळख पुसण्याचा प्रयत्न मनोहर भिडेंसारख्या मनुवादी प्रवृत्तीकडून सुरू आहे. या मनुवादी मनोहर भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने शनिवारी फडके हौद चौकात आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे, अजित दरेकर, संगीता तिवारी, लता राजगुरू, रफिक शेख, रजनी त्रिभुवन, मेहबुब नदाफ, सुनील शिंदे, सुजित यादव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. “देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात भिडे यांनी अत्यंत अवमानकारक विधान केले आहे.

मनोहर भिडे वारंवार असे बोलतात, त्यांना पाठीशी नेमका कोण घालते, याचा शोध घेणे आवश्यक आहे. महापुरुषांविषयी या विकृत भिडेंनी अत्यंत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करून त्वरित कठोर कारवाई करावी,” अशी मागणी शिंदे यांनी केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page