Sambhaji Nagar Crime: धक्कादायक! गावातील 36 वर्षीय महिलेकडं 19 वर्षाच्या तरुणाची शरीरसुखाची मागणी; नकारानंतर अंगभर केले कटरने वार

Photo of author

By Sandhya

Sambhaji Nagar Crime: मराठवाड्यात गेल्या काही दिवसात सातत्यानं क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटना ऐकायला मिळत आहेत. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता छत्रपती संभाजी नगरमध्ये एका १९ वर्षीय तरुणानं गावातील एका ३६ वर्षीय महिलेवर अंगभर कटरनं वार केल्याची धक्कादायक बातमी आहे.

या हल्ल्यात ही महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

गावातील ३६ वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या १९ वर्षांच्या तरुणाने नकारानंतर तिच्यावर अंगभर कटरने वार केल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली. या हल्ल्यामुळं या महिलेला शरिरावर तब्बल २८० टाके घालावे लागले. सव्वादोन फुटांचा एक वार तर मानेपासून मांडीच्या खालपर्यंत आहे. भयंकर वेदना सहन करत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

अभिषेक तात्याराव नवपुते (वय १९, रा. घारदोन, जि. संभाजी नगर) असं आरोपीचं नाव आहे. तो काही दिवसांपासून या विवाहितेचा पाठलाग करत होता. सुरूवातीला विवाहितेनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. पण ती रविवारी २ मार्च रोजी सायंकाळी शेतात काम करत असताना अभिषेकनं तिला एकटीला गाठलं. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. विवाहितेने विरोध करताच अभिषेकनं तिच्यावर चाकूहल्ला केला. धारदार चाकूनं त्यानं तिच्या मान, पाठ, डोकं, पोटावर वार केले, अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं ती रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाल्यानं बेशुद्ध पडली.

शेतातच दुसऱ्या बाजुला असलेली सासू तिथून घराकडं निघालेली असताना तीनं रस्त्यात बेशुद्ध पडलेल्या सुनेला पाहिलं आणि आरडाओरडा करत मदत मिळवली. त्यानंतर जखमी विवाहितेला शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. उपचारानंतर विवाहिता शुद्धीवर आली, तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रसंग कुटुंबियांना सांगितला. पीडित महिलेच्या जबाबावरुन आरोपी अभिषेकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतात लपून बसलेला तरुण अटकेत

याप्रकरणी सोमवारी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याची माहिती मिळताच आरोपी अभिषेक पसार झाला, तो शेतात लपून बसला. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपअधीक्षक पूजा नांगरे यांच्या सुचनेवरून पोलीस निरीक्षक रवीकिरण दरवडे, उपनिरीक्षक सतिष पंडित यांनी मंगळवारी त्याला अटक केली. म्हणजे ही भीषण घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी आरोपीला अटक झाली.

आरोपी गावात फिरत होता निवांत

नराधम आरोपी अभिषेक नवपुते या घटनेनंतर काही घडलेच नाही अशा अविर्भावात गावभर फिरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. अतिशय नियोजनबद्धरित्या त्यानं हा डाव साधला, या अँगलनंच पोलीस आता पुढील तपास करत आहेत. कोर्टात हजर केल्यानंतर त्याला कोर्टानं ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Leave a Comment