बई येथून अकोल्याला कुरिअरची वाहतूक करणाऱ्या पिकअप आणि ट्रकचा दौलताबाद माळीवाडा येथील समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप चालक गंभीर जखमी झाला.
तर क्लिनरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज (दि. १२) पहाटे ४ च्या सुमारास घडली. विजयकुमार रणजित डागी (वय ५०, रा. झारखंड) असे मृताचे नाव आहे. तर दिपू कुमार डागी (वय ३१, रा. झारखंड) असे जखमी चालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुरिअर वाहतूक करणारी पिकअप (एमएच २७ बी एक्स ७६४१) ही मुंबई येथून अकोल्याच्या दिशेने मंगळवारी (दि.११) रात्री अकराच्या सुमारास निघाली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथील माळीवाडा येथे समृध्दी महामार्गावर समोर असलेल्या ट्रकने लेन बदलला. यामुळे पाठीमागून येणाऱ्या पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले, यामुळे पिकअप पाठीमागून ट्रकला धडकली. यात पिकअपच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला.
क्लिनर विजयकुमार गंभीर जखमी झाला तर, चालक दिपुला मोठी दुखापत झाली. अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, दोन्ही जखमींना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.