शिक्षणाच्या जीवघेण्या स्पर्धेत सानिकाची आत्महत्या; बारामतीतील पालक चिंतेत

Photo of author

By Sandhya


बारामती

वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात.. शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळेतून आल्यानंतर वडिलांच्या व्यवसायाला मदत म्हणून कुठलीही लाज न बाळगता एक चिमुकली बारामती निरा रस्त्यावरील भाजीच्या स्टॉलवर भाजी विक्री करायची.. तिचं भाजी विक्रीतलं गणित पक्कं होतं.. व्यवहारीक गणितही नेटकं होतं.. फक्त प्रॉब्लेम झाला तो शाळेतल्या कधीही न पाहिलेल्या, कधीकधी व्यवहारात न बसणाऱ्या घोकंपट्टीच्या गणिताचा..! अन् पाच दिवसांपूर्वी बारामतीतील या चिमुकलीने शिक्षणाच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकणार नाही, म्हणून आयुष्याची नवी सुरुवात करण्यापूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला!

सानिका चिऊ जंजिरे.. 22 मार्च रोजी राहत्या घरात गळफास घेऊन नववीतील ही निष्पाप, चुणचणीत आणि उत्साही मुलगी निघून गेली.. कोणालाही काही न सांगता.. कोणावरही कसलाही टिपूर न ठेवता.. कदाचित तिने जगाचा निरोप कशासाठी घेतला असेल की, किमान आपल्यामुळे तरी या पुढच्या काळात कोणालाही शिक्षणाच्या आईचा घो म्हणायची वेळ येऊ नये म्हणून!

इयत्ता नववीत शिकणारी सानिका अतिशय चुणचुणीत.. खेळात उत्साही.. नेटबॉल स्पर्धेत उत्तम यश मिळवलेली ही मुलगी असं काही करेल, असं ना घरच्यांना वाटलं; ना शेजाऱ्यांना; न शाळेतल्या मैत्रिणींना..! गणिताच्या विषयात आपण नापास झालो, त्याचे शल्य तिला खूप बोचलं.. शिक्षकांनीही संवेदनशीलता व लवचिकता दाखवायला हवी होती असं तिला वाटलं असावं आणि या साऱ्यावर निराश होऊन तिने आपण आयुष्यात यशस्वी होणारच नाही, असं मनोमन ठरवूनच जगाचा निरोप घेतला असावा!

तिला मनोमन वाटत असावं.. आपण खेळात सर्वश्रेष्ठ आहोत, व्यवहारीक गणितात पक्के आहोत, पण केवळ शिक्षणाच्या घोकंपट्टीतील गणितात कच्चे राहिलो, याची आपल्याला वेळोवेळी जाणीव करून दिली गेली, म्हणूनच किमान आपल्या जाण्यानंतर तरी शिक्षणाच्या या पद्धतीमध्ये किमान लहान मुलांना तरी पैशाच्या हव्यासापोटी होत असलेल्या स्पर्धेत जीवघेणी वेळ येऊ नये!

तिच्या मृत्यूला आता पाच दिवस होऊन गेलेत.. तिचा भाजी विक्रीच्या स्टॉलवर असतानाचा हा फोटो पाहिला तर कोणालाही वाटेल की, ती किती उत्साही होती! लहान मुलांच्या या उत्साही आणि निष्पाप, निरागस बुद्धिमत्तेला शाळेतल्या यशाच्या स्पर्धेची नजर लागू नये एवढीच इच्छा! हिच्या खरंतर प्रत्येक पालकाची असेलच, पण शाळा आणि शिक्षक याकडे संवेदनशीलतेने पाहतील का?

नव्हे त्यांनी ते पाहिले पाहिजे, कारण आजची मुलं हळवी आणि संवेदनशील आहेत.. ती मातृत्वाच्या पंखाखाली लगेचच हवालदिल होतात. जुन्या पिढीसारखे कष्ट आणि जुन्या पिढीसारखी संयमशीलता त्यांच्याकडे नाही.. आणि त्यातच एक भयानक रोग शिक्षण व्यवस्थेला जडू लागला आहे. तो म्हणजे अलीकडे काही अकॅडमी ए..बी..सी अशा स्वरूपाच्या वर्गवारी करताहेत, दर महिन्याला एका खुरवड्यातून दुसऱ्या खुरवड्यात कोंबड्या टाकाव्यात, तसे कमी गुण मिळणाऱ्यांना ए कडून सी कडे आणि अधिक गुण मिळवणाऱ्यांना सी कडून ए कडे अशी स्थलांतरे विद्यार्थ्यांची होत आहेत..

पालकांनाही मजा वाटते आहे, आणि आपलीच शाळा जबरदस्त म्हणून, अर्धवट इंग्लिश फेकून पालकांवर प्रभाव टाकणाऱ्या अकॅडमी आणि खाजगी इंटरनॅशनल शाळा या अशा मुलांच्या भावभावनांचा विचार न करता, पालकांची भयानक लूट करत कसल्या तरी जागतिक करीअरच्या स्पर्धेचे लालूच दाखवून त्या निरागस कळ्यांना शिक्षणाच्या घोकंपट्टीला जुंपत आहेत. जिथे शिक्षण फुकट हवे तिथे प्रचंड किमतीला पालकांनीच शिक्षण विकत घेण्याची स्पर्धा सुरू केली आहे.

आपल्या मुलांची क्षमता लक्षात न घेताच त्यांना बैलगाडीच्या स्पर्धेप्रमाणे शिक्षणातल्या जीव घेण्यास स्पर्धेला जुंपणाऱ्या प्रत्येक पालकांनी जागे होण्याची हीच वेळ! सहाशे मुलांच्या अकॅडमीत 20 ते 30 मुले यशस्वी होणे हा काही यशाचा आकडा नाही, पण तरीही तुमचा मुलगा त्यामध्ये असणार, आम्ही त्याला तयार करू, अशा जाहिरातींना भुलणार असाल तर मुले निराश होतील, हे लक्षात घ्या! वेळीच सावध व्हा! सानिका जग सोडून गेली. तिच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला; पण आता बारामतीतील अनेक पालक चिंताग्रस्त आहेत, ते याच साऱ्या भविष्यातील प्रश्नांना सोबत घेऊन!

Leave a Comment

You cannot copy content of this page