केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. शाह यांनी काल एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी मातृभाषेचं महत्व सांगितलं. तसेच ‘मुंबईला बॉम्बे नको मुंबईच हवं या आंदोलनात मीही सहभागी झालो होतो’, असंही सांगितलं.
आज अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. यानंतर ते आता लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. याच दरम्यान यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावरून अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“अमित शाह पुढच्या वर्षी ‘लालबागचा राजा’ गुजरातला घेऊन जाणार नाहीत ना?” असं म्हणत निशाणा साधला आहे. “आम्हाला भीती वाटते की मुंबईतील जे जे प्रतिष्ठेचं आणि वैभवाचं आहे ते सर्व हे ओरबाडत असतील, नेणार असतील गुजरातला… देशाचे गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले तर आम्हाला भीती वाटली की पुढच्या वर्षी लालबागचा राजा अहमदाबाद किंवा गुजरातला तर घेऊन जाणार नाहीत ना? ही लोकांच्या मनातील भीती आहे.”
“अमित शाह इतक्या वेळा आले मुंबईत तेव्हा आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता का? पण आता हे भय वाढलेलं आहे. हे सत्तेच्या बळावर मुंबईतून काहीही उचलून घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे आम्ही लालबागच्या राजाचे भक्त आहोत, श्रद्धा आहे आणि त्याश्रद्धेच्या संदर्भात आमच्या शंका आहेत. ही सगळी झुंड आली आहे.
या झुंडने आमच्या लालबागच्या राजाविषयी काही वेगळा निर्णय घेतला तर… कारण लालबागच्या राजा ही शान आणि प्रतिष्ठा आहे.” “जगभरातून लोक येतात. देवाला सोनं देतात म्हणून देव नाही. तर लाखो श्रद्धाळू तिथे येतात म्हणून देव आहे. हे भाग्य मुंबईतल्या दैवताला मिळतंय. त्याच्यामुळे कोणाच्यातरी पोटात दुखत असेल.
म्हणून देवच पळवायचे… काहीही होऊ शकतं” असं म्हणत अमित शाह यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांनी भाजपा मुंबईच महत्त्व कमी करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला अप्रत्यक्षरित्या उत्तर देताना अमित शाह यांनी थेट इतिहासाचा दाखला दिला आहे.