संजय राऊत : “संकेत बावनकुळेंच्या गाडीमध्ये दारूसह बीफ कटलेटचं बिलं आढळलं”

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

राज्यात सध्या नागपूरमधील ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या कारने रविवारी मध्यरात्री तीन ते चार दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली.

या अपघातात काहीजण जखमी झाले होते. यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढीत तपास पोलीस करत आहेत. या घटनेत संकेत बावनकुळे यांचे नाव असल्यावरून विरोधकांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे.

आता यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की, “संकेत बावनकुळे यांच्या गाडीमध्ये एका लाहोरी बारचं बिल मिळून आलं.

त्यामध्ये संकेत बावनकुळे यांच्या खाण्या-पिण्याचा उल्लेख आहे. या बिलावर दारू, चिकन, मटणासह बीफ कटलेटचाही समावेश आहे. मग हिंदूत्व शिकवणाऱ्या लोकांनी बीफ कटलेट खाल्ले आहे. मग भाजप हिंदूत्व शिकवणार का?”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“संकेत बावनकुळे हे स्वत: ड्रायव्हिंग सीटवर बसलेले होते. मात्र, नंतर त्यांना बदलण्यात आलं. तुम्ही त्याला वाचवत आहात. मग कसल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी करतात? त्या गाडीमध्ये लाहोरी बारमधील एक बिल मिळालं आहे. ज्या बारमधून संकेत बावनकुळे हे बाहेर पडले, त्या बारमधील त्यांच्या खाण्या-पिण्याचं बिल लोकांसमोर आणलं पाहिजे.

त्या बिलामध्ये दारू, चिकन, मटण आणि बीफ कटलेटचाही समावेश आहे. या लोकांनी बीफ कटलेट खाल्याचा आणि त्याचे पैसे दिल्याचा उल्लेख बिलामध्ये आहे. मग भाजपावाले आम्हाला काय हिंदुत्व शिकवतात?”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“हॉटेलमधील ते बिल पोलिसांनी जप्त केलं. मग तुम्ही बीफ कटलेट खायचं आणि रस्त्यावर लोकांचे बळी घ्यायचे. या महाराष्ट्रात हे काय चाललंय? केणत्या प्रकारे देवेंद्र फडणवीस गृहखातं चालवत आहेत? तुम्ही अनिल देशमुखांना अटक करायला निघाले आहात?

मग तुम्ही त्यांच्या अटकेची तयारी करत आहात आणि तुमच्या डोळ्यासमोर एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या मुलाने गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. त्याला तुम्ही अभय देता? हे पाप कुठे फेडणार आहात?”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

रविवारी नेमकं काय घडलं?

रविवारी मध्यरात्री नागपूरच्या सीताबर्डी भागात एका ऑडी कारनं काही वाहनांना धडक दिली. यामध्ये काही वाहनांचं नुकसान झालेलं आहे. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली. ही कार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांच्या मालकीची असल्याचं स्पष्ट झालं.

आधी कारची नंबरप्लेट काढून ठेवल्याचं दिसून आलं. मात्र, नंतर ही नंबरप्लेट कारमध्येच असल्याचं पोलिसांना आढळून आलं. अपघात घडला तेव्हा संकेत बावनकुळे कारमध्ये होते की नाही? याबाबत सुरुवातीला स्पष्टता नव्हती.

मात्र, ते तेव्हा कारमध्येच होते, अशी माहिती आता समोर आली आहे. रात्री एका हॉटेलमधून जेवण करून घरी जात असताना हा अपघात घडल्याचं सीसीटीव्ही फूटेजच्या तपासात दिसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Leave a Comment