नाशिक पोलिसांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती स्वतः संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? असं म्हणतं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जाणून घ्या राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे काय म्हटले आहे.
लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा संजय राऊत यांनी त्यांच्यावर झालेल्या गुन्ह्यासंदर्भात एक ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता.
माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे “गठन”बेकायदेशीर ठरले आहे. व्हिपपासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्यापर्यंत सगळेच घटनाविरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील. असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला. मी कारवाईला घाबरत नाही.
लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल.” असे राऊत यांनी म्हटले आहे. हे ट्विट राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आदित्य ठाकरे यांना टॅग केलं आहे.