संजय राऊत : मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील…

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर त्यांना देश सोडून पळून जाण्याशिवाय पर्याय नाही. या देशाच्या बाबतीत या लोकांनी इतके भयंकर अपराध केलेत.

ब्रिटिशांनी हा देश लुटला नसेल त्यापेक्षा जास्त गेल्या १० वर्षात देश लुटला. ते दरोडेखोर कमी पडले म्हणून आमच्यातले ४० जण आणि राष्ट्रवादीतले ४० जण घेतलेत असा घणाघात उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

ठाण्यातील जाहीर सभेत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, या महाराष्ट्रातलं चित्र बदलतंय. ४ जूननंतर तुम्हाला या राज्याचा खरा नेता आणि शिवसेना कुणाची हे जनता सांगेल.

गेल्या २ दिवसांपासून मुख्यमंत्री कुठे आहेत ते शोधतोय. चोरलेला धनुष्य विजयी करण्यासाठी पैसे वाटप करत फिरतायेत. कोल्हापूरात शाहू महाराज जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज त्यांचा पराभव करण्यासाठी हे महाशय १०० कोटी घेऊन कोल्हापूरच्या हॉटेलात बसलेत असा आरोप त्यांनी केला.

तसेच महानगरपालिकेत लोकांना पगार द्यायला पैसे नाहीत. हे ५०-५० कोटी आमदारांना देतात, १०० कोटी खासदारांना देतात. ठाण्याची निवडणूक रंगतदार आहे. राजन विचारे नुसते शाखेत बसून राहिले तरी लोक तुमच्या पारड्यात मतदान करणार आहे. कधी तो दिवस येतोय बटण दाबण्याचा याची लोक वाट पाहतायेत.

नरेंद्र मोदी-अमित शाह महाराष्ट्र चालवणार का एवढे वाईट दिवस राज्यावर आले नाहीत. आजही बाळासाहेबांनंतर शरद पवारांसारखा नेता इथं खंबीरपणे उभा आहे. आम्ही सगळे एका ताकदीने उभे आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं. दरम्यान, एकनाथ शिंदेंसारखे डरपोक लोक माझ्या आयुष्यात पाहिले नाहीत.

मी साक्षीदार आहे. अयोध्येला असताना माझ्या खोलीत आले होते, काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. हे आमचे वय तुरुंगात जायचं नाही. तुरुंगात जायला मला भीती वाटते. हे अयोध्येत रामाच्या साक्षीने त्यांचा आणि माझा संवाद झाला.

काहीतरी करा. आपण मोदींसोबत जायला हवं असं ते म्हणाले, तुम्हाला तुरुंगात कोण आणि का पाठवेल, तुम्ही राष्ट्रासाठी काय क्रांती केलीय असं विचारले, ईडी, सीबीआय उगाच कुणाच्या मागे लागत नाही. माझ्याही मागे लागले, पण सोडावे लागले.

हे महाशय घाबरून पळून गेले, विचार, निष्ठा काहीही नाही. शिवसेनेच्या नावावर पैसा कमावले, त्या लुटीला संरक्षण हवं म्हणून मोदींचा मार्ग पकडला अशी टीकाही संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page