केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव भाजपच्या उमेदवारीच्या पहिल्या यादीत जाहीर झाले नाही. त्यांच्या नावाला विलंब करून त्यांना अपमानीत करण्याचा प्रकार भाजप मध्ये झाला असून, याला निवड समितीत सहभागी असलेले फडणवीस कारणीभूत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
या संबंधात त्यांनी एक्सवर एक पोस्ट टाकून हा आरोप केला आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, ‘देवेंद्र फडणवीस हे मोदी शहांच्या निवड समितीचे सदस्य आहेत. पहिली यादी जाहीर करताना त्यात नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश असयला हवा असा आग्रह फडणवीस धरू शकले असते.
महाराष्ट्रातील महायुतीचे जागा वाटप निश्चीत झालेले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याच उमेदवाराचे नाव घोषित होऊ शकलेले नाही हा केवळ एक बहाणा आहे.
गडकरींच्या उमेदवारीचा महाराष्ट्रातील जागा वाटपाशी काडीचाही संबंध नाही. केवळ त्यांना अपमानीत करण्यासाठीच त्यांचे नाव जाहीर झालेले नाही. या कट कारस्थानात निवड समितीचे सदस्य म्हणून फडणवीस त्यात आनंदाने सहभागी झाले आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील कृपाशंकरसिंह नावाच्या भ्रष्ट नेत्याला उत्तरप्रदेशातून उमेदवारी जाहीर होऊ शकते पण गडकरींना डावलले जाते असा दावा करून उद्धव ठाकरे यांनीही भाजपवर टीका केली होती. गडकरींना महाविकास आघाडीतून उभे राहावे आम्ही त्यांना निवडून आणू असेही ठाकरे म्हणाले होते.