बदलापूरच्या शाळेमध्ये दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले. तसंच बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलनही करण्यात आलं.
तसेच आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी केली जात आहे. बदलापूरच्या घटनेवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. काय म्हणाले संजय राऊत ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरच आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं असल्याचे म्हंटले. याद्वारे त्यांनी विरोधकांवर संशय व्यक्त केला, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एक संशयी आत्मा आहेत. त्यांचा दिवसातला अर्धा दिवस हा त्यांचा संशयकल्लोळ, जादूटोणा, मंत्र-तंत्रात जातो.
त्यांना असंही वाटलं असेल की बदलापूरचं आंदोलन हे पण जादूटोणा झाल्यानेच झालं असेल.” पुढे ते म्हणाले, “आपले मुख्यमंत्री जादूटोणाप्रेमी आहेत. पण त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर कळेल की लाखो लोक चिडून रस्त्यावर उतरले. तुमचा मुलगा तिथला खासदार आहे हे विसरु नका. एकाच वेळेला तुमच्या मुलाच्या मतदारसंघातले लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत.
तुम्ही किंवा तुमचा मुलगा आंदोलकांच्या भेटीला जाऊ शकले नाहीत. एवढे तुम्ही घाबरला होता,” असेही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना म्हंटले. “बदलापूरच्या घटनेनंतर पोलिसांनी 10 तास तक्रार नोंदवून घेतली नाही. हे विरोधकांनी केलं काय? मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत आणि गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत.
महाराष्ट्राला मूर्ख समजलात का? विरोधकांना एवढीच काम आहेत का? महाराष्ट्रात ठिकठिकाणी अत्याचार सुरु आहेत, असे असताना मुख्यमंत्री काय करतायत?”, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.