उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या तीन पैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान , बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गॅंगने घेतली आहे. यावरून आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
सरकारवर ताशेरे ओढत संजय राऊत म्हणाले, “हिंमत असेल तर या घटनेचा सूत्रधार बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्याचा एन्काउंटर करा” असे आव्हान दिले आहे. काँग्रेसमधून निवडणूक प्रवास सुरू करून अजित पवार गटात सामील होऊन राष्ट्रवादीचे नेते बनलेल्या बाबा झियाउद्दीन सिद्दीकी यांची शनिवारी तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी या हल्ल्यात थोडक्यात बचावला होता.
बाबा सिद्दीकी यांच्यावर हा हल्ला झाला तेव्हा ते आणि त्यांचा मुलगा निर्मल नगर, वांद्रे येथील त्यांच्या कार्यालयातून निघाले होते. गोळी लागल्याने त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारीचे सूत्रसंचालन गुजरातमधून – दरम्यान, याच घटनेवर संजय राऊत यांनी, गुजरात एटीएसच्या ताब्यात असलेली व्यक्ती मुंबईतल्या एका हत्येची जबाबदारी घेते. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारीचे सूत्रसंचालन गुजरातमधून होत आहे असे आम्ही म्हणत आहोत. त्याला हे ज्वलंत उदाहरण आहे.
मुंबईतून उद्योग पळवायचे, मुंबईतून पैसा पळवायचा, मुंबईतील माणसांना त्रास द्यायचा, मुंबईतील माणसांच्या हत्या करायच्या हे सर्व गुजरातमधून होत आहे. याचं सगळं सूत्रसंचालन गुजरातमध्ये होत आहे. खरं म्हणजे अमित शहा यांचा राजीनामा मागावा असं हे प्रकरण आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तर तुमच्या गुजरातच्या तुरुंगातला एक गँगस्टर आमच्या महाराष्ट्रातल्या एका राजकीय नेत्याची हत्या करतो आणि तुम्ही काय करताय? आतापर्यंत त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत मी याबाबत काही सांगणार नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.
अजितदादांनी मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा मागावा – पुढे बोलताना संजय राऊत यांना,”गुंडांची टोळी महाराष्ट्रावर चाल करत आहे. यासंदर्भात अजितदादांनी काहीतरी पाऊल उचलले पाहिजे का? “असे विचारले असता त्यांनी, अजितदादा पण सिंघम आहेत. तिथे एक फुल, दोन हाफ सिंघम आहेत. अजित पवारांनी त्यांच्या एका सहकाऱ्याची हत्या झाली.
त्याच्यावर फक्त निषेध व्यक्त करण्याशिवाय काय केले? खरं म्हणजे अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. या राज्याची कायदा-सुव्यवस्था कोलमडून पडली आहे आणि त्याच मंत्रिमंडळात तुम्ही बसत आहात. त्याच मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. तुम्ही काय करताय? सामान्य माणसाला घराबाहेर पडायला भीती वाटत आहे.
कधी कुठून गोळी चालेल आणि कधी कुठून कोयत्याचे हल्ले होतील याचा काही भरोसा नाही. या सगळ्या गुंडांचा वापर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजकारणासाठी करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. तर या तीन लोकांनी खोकेगिरी कमी केली तर बरं होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.