संजय राऊत : सध्याचे सरकार बैल पुत्र, त्यांचा बाप बैल, त्यांची बुद्धीही बैलाची…

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

गायीला राज्यमातेचा दर्जा देत गोशाळांना प्रत्येक गायीमागे दररोज ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.

संजय राऊत यांनी सरकारच्या या निर्णयावरून जोरदार निशाणा साधला आहे. ‘सध्याचे सरकार बैल पुत्र आहेत, त्यांचा बाप बैल आहे, या सरकारचा बाप बैल असल्यामुळे यांची बुद्धीही बैलाची आहे, हे बैल बुद्धीची लोकं आहेत.’, अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दुसरं काही काम नाही. आम्ही गौ मातेला मानतो. आम्हाला सांगायची काही गरज नाही पण गौ मातेच्या कत्तली ज्या भाजप शासित राज्यात होत आहेत त्यावर जरा सांगा.

गाईला राज्य माता करून तुम्ही गाईचं रक्षण कसं करणार. खरं तर गाईच्या दुधाला भाव द्या, शेतकऱ्यांचा दुधाच्या भावासाठी जो संघर्ष चाललाय त्यावर चर्चा करा आणि त्यावर बोला. पण ज्यांचा बापच बैल आहे आणि ज्यांची बुद्धीच बैलाची आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा करता. निवडणुकीसाठी असे फंडे करत असतात.’ अशी टीका राऊतांनी केली.

तसंच, ‘दिल्लीतून काही बैल येत असतात. काही केंद्रातून फिरत असतात. महाराष्ट्राचा त्यांनी बैल बाजार केलेला आहे. गाईची पूजा आम्ही सर्व करतो त्यासाठी शासकीय आदेश काढण्याची गरज नाही. तुम्ही सावरकरांना मानता ना, तुमचे जे कोणी हिंदुत्वाचे गब्बर आहेत त्यांनी सावरकरांचं गाई विषयी जे म्हणणं आहे ते एक हिंदू म्हणून ते आधी समजून घ्या.

जर तुम्ही या घोषणा केल्या असतील तर तुम्ही सावरकरांचं नाव घ्यायचं नाही. वीर सावरकर यांनी गौ मातेविषयी जे मत जी भूमिका स्पष्ट केलीये ती जे मान्य असती तर त्यांनी सावरकरांचं नाव घ्यावं. सावरकर जर आता असते तर त्यांनी यांच्या कानाखाली लगावली असती.’ असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page