
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली. मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील वातावरण या घटनेने ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. तर, काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. तर, दुसरीकडे विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. आता, या प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर करणाऱ्याला 51 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर करेल, अथवा फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवले त्या अधिकाऱ्याला 51 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्याशिवाय 5 एकर जमीन देण्यात येणार असल्याची घोषणा एका शेतकऱ्याने केली आहे. संतोष देशमुखच्या सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला 2 लाखांचे रोख बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणाही या शेतकऱ्याने केली आहे. माढामधील वडशिंगे येथील शेतकरी कल्याण बाबर यांनी ही घोषणा केली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येला 10 दिवस उलटून गेले आहेत. तरी या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधाराला अद्याप अटक करण्यात आली नाही. या मुद्यावरून फक्त बीडमध्ये संतापाचे वातावरण आहे. आता माढामधील शेतकरी कल्याण बाबर यांनी केलेल्या घोषणेने पुन्हा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
कल्याण बाबर यांनी जाहीर केलेल्या बक्षिसाचे प्रतिज्ञापत्र जाहीर केले आहे. हे प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह पोलिस महासंचालकांना पाठवण्यात आले आहे. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, तो सत्ताधारी अथवा विरोधकांचा असला तरी गुन्हेगाराची दहशत संपली पाहिजे, त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे असे कल्याण बाबर यांनी म्हटले.