राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पॉवर प्ले खाते वाटपानंतर रंगला आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांची एन्ट्री होताच शिंदे गटातील नेते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत सहभागी करून घेतल्याने शिंदे गटातील आमदारांसह भाजपामध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे.
अशात साताऱ्यामध्ये येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. यादरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे आणि जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीवेळी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले,’राज्यातल्या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत. आपल्या नेतृत्वाला माहिती आहे की, कोणाला बरोबर घ्यायचं आणि कधी सोडायचं?’
दरम्यान ते पुढे म्हणाले,’भाजप पक्षाने खूप विचार करून निर्णय घेतला आहे. भाजप पक्षाचे नेतृत्व खूप सक्षम आणि खूप विचारी आहे. त्या नेतृत्वाला माहिती आहे, कोणाला आपल्याबरोबर घ्यायचं, कोणाला सोडायचं, कोणाला किती दिवस आपल्याबरोबर ठेवायचं आणि कोणाला कधी सोडायचं? हे सगळं आपल्या नेतृत्वाला माहिती आहे.
तसेच या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत.”असेही गोरे म्हणाले आहे. दरम्यान त्यांच्या या विधानावरून आता राजकारण तापले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत होते का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.