“सरकारला लाज वाटायला हवी”, राज ठाकरे यांनी मणिपूरच्या घटनेवर पहिल्यांदाच भाष्य केले

Photo of author

By Sandhya

राज ठाकरे यांनी मणिपूरच्या घटनेवर पहिल्यांदाच भाष्य केले

मणिपूरमधील कुमी-झोमी समाजाच्या दोन महिलांना निर्वस्त्र करुन त्यांची धिंड काढल्याच्या प्रकरणाचे राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत.

संसदेत सर्वप्रथम या विषयावर चर्चा घेण्यात यावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर निवेदन करावे, असा आग्रह विरोधी पक्षांनी धरला. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मणिपूरच्या घटनेवर पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

सरकारला लाज वाटायला हवी, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. ठाकरे यांनी या संदर्भात एक ट्वीट केले आहे.

राज ठाकरे म्हणाले, कालपासून मणिपूर मधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत.

मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आणि हेच दुर्दैव आहे. ह्या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी.

पण त्याचवेळेस जर केंद्र सरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवे. मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडले त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे.

ह्यातून काही वर्षांनी एखादे आक्रीत घडले तर त्याला मात्र सध्याचेच सरकार जबाबदार असेल. पंतप्रधानांनी आत्ता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून दिला आहे.

Leave a Comment