जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
कर्नाटक सरकारने तर त्या संबंधात दक्षता आदेश जारी केला आहेत. तसेच, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी, आजार असलेल्या लोकांनी, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांनी घराबाहेर पडताना फेस मास्क घालण्यास सांगण्यात आले आहे.
लोकांनी हवेशीर नसलेल्या जागा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे काटेकोरपणे टाळण्यास सांगितले आहे. कर्नाटक शेजारील केरळ राज्यात कोविडचा नवीन विषाणू आढळून आल्याने ही दक्षता घेतली जात आहे.
तसेच कर्नाटक सरकारने केरळ आणि तामिळनाडूच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि कोविड प्रकरणांची पुरेशी चाचणी आणि वेळेवर अहवाल देण्याचे निर्देश देणारे परिपत्रक जारी केले आहे.
तर, आता महाराष्ट्रात देखील आरोग्य विभाग सतर्क झाला असून नागरिकांना काळजी घेण्याची आव्हान केले जात आहेत. दरम्यान, नव्या JN.1 चे गांभीर्य लक्षात घेऊन लसीच्या चौथ्या डोसची आवश्यकता आहे का? याची विचारणा होत आहे.
आवश्यकता असेल तर चौथा डोस कधी मिळणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता सरकारने एक मोठी माहिती दिली आहे. भारत SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की,
“देशात JN.1 प्रकाराची उपस्थिती निश्चितच चिंताजनक आहे, 60 वर्षांवरील व्यक्तींना श्वास घेण्यात अडचण येत असेल. तसेच ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी तिसरा डोस घेतला नसेल तर सावधगिरीचा उपाय म्हणून तिसरा डोस घ्यावा.
परंतु, सध्या तरी करोना लसीच्या चौथ्या बूस्टर डोसची गरज नाही. लोकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी आणि करोना नियमाचे जास्तीत जास्त पालन करावे असा सल्ला दिलाय. तसेच JN.1 हा नवीन प्रकार जगभरातील अनेक देशांमध्ये आपला प्रभाव दाखवत आहे.
यामुळे खूप लोक आजारी पडले आहेत. सुदैवाने, ओमिक्रॉनच्या नवीन उप-प्रकाराचा भारतात फार प्रभाव दिसून आला नाही. या प्रकारामुळे गंभीर आजारी पडलेल्या कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्याची कोणतीही नोंद नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.