Saswad Municipal Council honoured in the state in the Majhi Vasundhara campaign


सासवड नगरपरिषदेने स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. मागील वर्षीच्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत २५ ते ५० हजार लोकसंख्या गटात सासवड नगरपरिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून, शनिवारी (ता. २१) मुंबईत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या गौरवावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.
पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सासवड नगरपरिषदेला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गतवर्षीच्या या अभियानात राज्यातील तब्बल २२ हजार ६३२ स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या होत्या. या चुरशीच्या स्पर्धेत सासवडने आपल्या उत्कृष्ट नियोजनाच्या जोरावर ३ कोटी रुपयांचे रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह प्राप्त केले आहे. मागील वर्षी प्रशासकीय राजवट असल्याने या पुरस्कारांचे वितरण यावर्षी मोठ्या उत्साहात पार पडले.
मुंबईतील या गौरव सोहळ्याला माजी आमदार संजय जगताप, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेते अजित जगताप यांसह नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर गिरमे, सोपान रणपिसे, मयूर चौखंडे, नगरसेविका प्रियांका जगताप, लिना वढणे, स्मिता जगताप, अर्चना जगताप, माजी उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, विजय वढणे, संदीप राऊत, साकेत जगताप, सौरभ वढणे, सुहास जगताप, तुषार जगताप, हिरामण हिवरकर आणि शहर स्वच्छता समन्वयक राम कारंडे यांनी उपस्थित राहून सासवडचा हा बहुमान स्वीकारला.
सासवड नगरपरिषदेने गेल्या काही वर्षांत राबविलेले अभिनव उपक्रम या यशाचे मुख्य कारण ठरले आहेत. शहरात केलेले मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, शास्त्रशुद्ध कचरा व्यवस्थापन आणि सौर ऊर्जेचा प्रभावी वापर या त्रिसूत्रीमुळे सासवडने राज्य स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. या यशामुळे संपूर्ण पुरंदर तालुक्यातून नगरपरिषदेचे कौतुक होत आहे.