सासवड | पोलीसांकडून लॅपटॉप,मोबाईल चोराला अटक

Photo of author

By Sandhya


सासवड :

सासवड पोलिसांनी सासवड (ता.पुरंदर) येथील साठेनगर परीसरात एका चोराला अटक करून त्याच्याकडून आठ लॅपटॉप आणि नऊ मोबाईल असे एकूण ४ लाख २६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गणेश मंजाप्पा ( वय ३० वर्षे ) मुळ उदयराजा पालायम, ता. तोटाल्लम, जिल्हा अंबुर (वेल्लोर) तामिळनाडू असे या चोरट्याचे नाव असून त्याच्यावर पुणे शहरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आली. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

    याबाबत पुणे येथील अॅक्सेन्चर मगरपटटा येथील कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनिअरींगचा विद्यार्थी वल्लकोंडा राजानरसिंमा रेडडी ( वय २० वर्षे ) मुळ हमनकोंडा तेलंगणा याने सासवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. याबाबतचे वृत्त असे, फिर्यादी रेड्डी हा बुधवारी ( दि. १) सकाळी सासवड येथील संगमेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन पीएमटीने हडपसरकडे निघाला होता. त्यावेळी तिकिट काढण्यासाठी बॅग चेक केली असता बॅगेची चैन उघडलेली दिसली. बॅगेमध्ये अॅपल कंपनीचे वॉच व पाकिट नव्हते. फिर्यादीवरून सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं ०१/२५ बी.एन.एस ३०३(२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला. फिर्यादीचे अॅपल वॉच हे त्याचे आयफोन मोबाईलला कनेक्ट असल्याने त्याचे लोकेशन सासवड येथील पीएमटी स्टॉप समोर येत होते. पोलीस प्रशासनाने तातडीने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदरचे लोकेशन हे पुरंदर हायस्कुल समोरील साठेनगर येथे आले व तेथे वॉच मोबाईल फोनला कनेक्ट झाले. 

    पोलीसांनी सदर घराचा दरवाजा वाजविला असता गणेश मंजाप्पा बाहेर आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये फिर्यादीचे चोरी झालेले अॅपल कंपनीचे वॉच आणि त्याच्या जवळील बॅगमध्ये तीन लॅपटॉप मिळून आले. सदर लॅपटॉपबाबत विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे आल्याने त्याला ताब्यात घेवुन अटक केली असता घरझडती मध्ये आणखी पाच लॅपटॉप व नऊ मोबाईल फोन मिळून आले. असे एकुण आठ लॅपटॉप, नऊ मोबाईल फोन व अॅपल वॉच असा एकुण ४ लाख २६ हजारांचा मुद्दमाल पोलीसांनी हस्तगत केला. उपविभागिय पोलीस अधीकारी तानाजी बरडे, सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सासवड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे, हवालदार सुरज नांगरे, रूपेश भगत, आबासो बनकर, अक्षय चिले, सागर कोरडे, प्रणय मखरे, विकास ओमासे, तुषार लोंढे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे करीत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page