
सासवड : येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचे ( दि. १० व दि. ११) दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन “आकाशी झेप घे रे पाखरा” या प्रेरणादायी विषयावर नुकतेच संपन्न झाले. इंग्लीश मिडीयम आणि सी बी एस ई माध्यमाच्या या विद्यालयातील नर्सरी ते ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध भाषांतील गितांवरील नृत्य, नाटीका, गायन, देशभक्तीपर गितांवरील नृत्यांच्या सादरीकरणाने विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, विश्वस्त व ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या उपस्थितीत आणि पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी संजय जाधव, बहरीन पुरस्कार विजेते नवनाथ झांजुर्णे, कॅप्टन युनूस शिपच्यांडलर यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने उदघाटन झाले. याप्रसंगी सहसचिव दत्तात्रय गवळी, व्यवस्थापक कानिफनाथ आमराळे, प्राचार्या रेणुकासिंग मर्चंट, उपप्राचार्या सुषमा रासकर, सीबीएसई विभागाचे प्राचार्य अनिल पाटील, उज्वला जगताप, स्वाती जगताप, जनसंपर्क अधिकारी अमोल सावंत, जिजामाता इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या सरिता कपूर यांसह पालक उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांनी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणातील वाढती गुणवत्ता अधोरेखित करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर नवनाथ झांजुर्णे यांनी जिद्द आणि मेहनतीच्या माध्यमातून कशाही मर्यादा पार करता येतात यावर प्रेरणादायी विचार मांडले. स्वाती भारती, आकांशा भोईटे, शीतल बोरुडे, आणि हेमाली गोसावी यांनी सुत्रसंचलन केले तर चित्ररेखा केसकर आणि वर्षा कापरे यांनी आभार मानले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. महाराष्ट्र गीताने स्नेहसंमेलनाचा समारोप झाला.