सतेज पाटील : महापुराकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष…

Photo of author

By Sandhya

सतेज पाटील

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरातील पूरग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

केंद्रात आणि राज्यात सरकार असणाऱ्या सत्ताधारी मंडळींनी महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत द्यावी, असे काँग्रेस नेते आणि माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

पूरग्रस्तांशी संपर्क साधत असताना स्थलांतर झालेल्या कुटुंबीयांच्या घरात संसार उपयोगी वस्तूंची चोरी झाल्याची कैफियत मांडली. पालिका प्रशासनाने याचेही पंचनामे करून चोरी झालेल्या साहित्याची यादी वैयक्तिक पाठवावी, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

सतेज पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर एस. के. पाटील महाविद्यालय येथे स्थलांतरित पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या परिसरात अतिवृष्टी झाल्याने महापूर निर्माण झाला. महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठीची महाविकास आघाडीची भूमिका आहे.

महापूर तुंबून राहिले आहे. सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सरकारने शेतीचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी आणि सानुग्रह अनुदान देण्यासाठी आदेश द्यावेत, असे पाटील म्हणाले.

यावेळी बापूसाहेब आसंगे, नायकू दळवी, सचिन मोहिते, बबलू पवार आदींनी गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून जनावरांसाठी सुका चारा मिळावा, या मागणीचे निवेदन दिले. पूरग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करावी व परीक्षा फी माफी मिळावी, या मागणीचे एस. के. पाटील महाविद्यालय, दत्त महाविद्यालयातर्फे निवेदन देण्यात आले.

सतेज पाटील यांनी निवेदन स्वीकारून विधान परिषदेच्या माध्यमातून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी दत्त सहकारी साखर कारखान्याचे उद्यान पंडित गणपतराव पाटील, रणजीतसिंह पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, बाबासाहेब सावगावे, राजू आवळे, अक्षय आलासे, अजित देसाई, अनंत धनवडे, सुरेश बिंदगे, कुमार माने, किरण गावडे, नितीन बागे, फारूक जमादार, विलास पाटील, आदी नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment