शहर आणि जिल्ह्यातील २११ हॉटेल, बार, पब यांच्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. या सर्व हॉटेल, बारवर कारवाई करावी, असे या विभागाने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह पीएमआरडीएला कळविले आहे.
कल्यानीनगर अपघात घटनेनंतर हॉटेल, बार, पब यांची अनधिकृत बांधकामांसह अन्य अनियमितता चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागासह महापालिकांनी मोठ्या प्रमाणात पब, हॉटेल, बार यांच्यावर कारवाई केली आहे. त्यात अनेकांना टाळे ठोकले आहेत.
आता पुन्हा नव्याने २११ हॉटेल, बार, पब प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. १ एप्रिल ते २६ जून या कालावधीत पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्यातील बार, पब, हॉटेल यांची पाहणी केली. त्यामध्ये २११ आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने मंजूर बांधकामांपेक्षा अधिक बांधकामे, प्रत्यक्षात जागेच्या वापरात बदल, अशा प्रकारच्या अनियमितता आढळून आल्या आहेत. त्यावर संबंधित महापालिका आणि पीएमआरडीएने कारवाई करावी, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी कळविले आहे.
अनेक नामांकित हॉटेल, बारचा समावेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने महापालिकांना जी २११ हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांची यादी पाठविली आहे, त्यामध्ये शहरातील बाणेर, बालेवाडी, राजा बहादूर मिल्स, फर्गुसन रस्ता, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, खराडी, विमाननगर या भागातील अनेक नामांकित हॉटेल, बारचा समावेश आहे. त्यामुळे महापालिका आता त्यावर कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.