शहरात आणखी तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे..

Photo of author

By Sandhya

शहरात आणखी तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे

सुरक्षिततेसाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बसविलेल्या सुमारे अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र, आणखी सुमारे तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद केले आहे.

शहरात पोलिस आणि महापालिकेकडून महत्त्वाचे रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेर्‍यांमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास तसेच आरोपी निष्पन्न होण्यास मदत होत आहे.

या यंत्रणेसंदर्भात राज्य सरकारकडून पोलिस आयुक्त कार्यालयास निधी मिळाला असून, त्यापार्श्वभूमीवर एक बैठक पार पडली. या बैठकीत नव्याने किती ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे, यासंदर्भातील अहवाल मांडला गेला. या बैठकीला पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल हे उपस्थित होते.

पोलिसांच्या अहवालानुसार शहरात आणखी 2 हजार 882 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असल्याचे नमूद केले गेले आहे. दरम्यान, पोलिसांकडे एक हजार कॅमेर्‍यांची नोंद असल्याची माहीती या अहवालातून पुढे आली.

महापालिकेचे अधिकारी कंदुल यांनी महापालिकेने बसविलेल्या सुमारे अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पुन्हा एकदा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याची वेळ आली आहे. पोलिस ठाण्यात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे यांची माहिती आता जमा केली जाणार आहे.

Leave a Comment