शंभूराज देसाई : मराठा आरक्षणासंदर्भात एकही दिवस वाया घालवलेला नाही…

Photo of author

By Sandhya

शंभूराज देसाई

जरांगे पाटील यांना ज्यावेळी भेटलो होतो तेव्हा त्यांच्याकडे दोन महिन्यांची वेळ आम्ही मागितली होती. परंतु त्यांनी एकाच महिन्यांचा कालावधी दिला. ते सातत्याने म्हणत आहेत की, माननीय मुख्यमंत्र्यांवर त्यांना विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांनी मला नेहमीच आदेश दिलेले आहेत की एकही दिवस वाया न घालवता याबाबतीतलं काम चालू ठेवा.

त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाण्यात दिली आहे. जरांगे पाटील यांनी संयम बाळगावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ठाणे जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री शंभूराजे देसाई हे ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षासंदर्भात माहिती दिली. ज्यावेळी जरांगे पाटलांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी दोन-तीन गोष्टी महत्त्वाच्या मांडल्या होत्या.

हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आग्रह जो जरांगे पाटील यांचा आहे, यासाठी आमच्या 11 अधिकाऱ्यांची टीम गेल्या चार दिवसांपासून तेलंगणा गव्हर्मेंटकडे गेलेल्या आहेत. त्या टीम परत आलेल्या आहेत, मात्र त्यांच्याशी अद्याप माझी चर्चा झालेली नाही.

सोमवारी त्यांच्याशी माझी चर्चा होणार असून, त्याबाबतीत पण आम्ही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

सगेसोयरे संदर्भात ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढलेला आहे. आठ लाखापेक्षा जास्त ऑब्जेक्शन हरकती आलेल्या आहेत. त्यानंतर सुद्धा कालच्या बैठकीत याबाबतीत कायदेशीर सल्ला घेण्यात आला असून, सगळ्या बाबतीतली छाननी आमच्या विभागामार्फत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र मनोज जरांगे यांनी थोडासा संयम बाळगला पाहिजे. दोन-तीन आठवडे अधिवेशनात गेले, सोमवारपासून रोजच्या रोज आमचा याबाबतीत काम करण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page