सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे चारही आमदारांनी खासदार उदयनराजेंचा प्रचार जोमाने सुरू केला आहे. त्यातून सैदापूर (ता. कऱ्हाड) येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकॉर्ड ब्रेक सभेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल,
असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरपीआय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवलेही येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शिवसेना शिंदे गटाचे नेते पुरुषोत्तम जाधव, अमित कदम, माजी आमदार कांताताई नलावडे,
मनोजदादा घोरपडे, भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र महिला संघटक चित्रलेखा माने-कदम, भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे आदी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, ‘‘खासदार उदयनराजे यांच्या प्रचारार्थ ‘मी स्वतः माझ्या मतदारसंघात ११ जाहीर सभा घेणार आहे. पाटणमध्ये बंधू रविराज आणि मुलगा यशराज यांचे गावोगावी काम सुरू आहे.
पाटण व कऱ्हाडच्या दोन्ही मतदारसंघांत उदयनराजेंना मताधिक्य मिळेल. आमदार मकरंद पाटील हे पूर्ण ताकदीनिशी कामाला लागले आहेत. त्यांचे कार्यकर्ते मतदारसंघात उदयनराजेंचे काम करत आहेत. माजी आमदार मदन भोसले यांनीही काम सुरू केले आहे. त्यामुळे आम्हाला वाई येथे मताधिक्य मिळणार आहे.’’