‘‘लोकसभा निवडणुकीचा लागलेला हा निकाल परिवर्तनाला पोषक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बदलासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाला या निकालाने प्रेरणा मिळाली आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले,
तसेच ‘‘पुढची दिशा ही ‘इंडिया आघाडी’च्या बैठकीत ठरेल,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पवार म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीचा हा निकाल लागल्यानंतर मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. कदाचित दिल्लीत उद्या संध्याकाळी आमची बैठक पार पडेल. या बैठकीत आम्ही सामंजस्याने निर्णय घेऊ.’’ ते म्हणाले, ‘‘आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रात १० पैकी ७ जागांवर आघाडी घेतली आहे.
हे यश फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही, तर काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी मेहनत केली, त्यामुळे हे यश सगळ्यांना मिळाले.’’
पवार म्हणाले, ‘‘बारामतीमधून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली. त्यामुळे बारामती मतदारसंघांमध्ये आम्हाला चांगले ‘लीड’ मिळाले. राज्यात ठाकरे-काँग्रेस आणि आम्ही जीवाभावाप्रमाणे लढलो.
लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असे चित्र आहे.’’ महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला याबद्दल महाराष्ट्रातील जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करतो,’’ असेही शरद पवार यांनी या वेळी सांगितले.
या निवडणूक निकालाने देशातील चित्र बदलले असून, यात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका आहे. याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा मला अभिमान आहे. अगदी शेवटच्या घटकाच्या हिताची जपणूक करण्यासाठी आम्ही सतत सामूहिक प्रयत्न करू, असा शब्द देतो.