शरद पवार : सत्तेतील लोकांची भूमिका शपथेशी विसंगत यामुळे परिवर्तन अटळ…

Photo of author

By Sandhya

शरद पवार

अडचणीतील साखर कारखान्यांना मदत करण्याची भूमिका सोडून बलवानांना मदत करण्याचे सरकारचे धोरण हे मंत्रीपद स्वीकारत असताना घेतलेल्या शपथेशी सुसंगत नाही.

यामुळे अशा वृत्तीला दूर ठेवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी सोमवारी शेतकरी मेळाव्यात केले.

कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व रोहित पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सोमवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी खा. पवार बोलत होते. यावेळी आ.सुमनताई पाटील, आ.अरूण लाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

यावेळी बोलताना खा. पवार म्हणाले, काही दिवसापुर्वी शासनाने राज्यातील १३ साखर कारखान्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला. मदत करण्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही.

मात्र, केवळ बलवानांना मदत आणि ज्यांना खरीच मदतीची गरज आहे अशांकडे दुर्लक्ष करण्याची सत्तेत असलेल्यांची प्रवृत्ती राज्याच्या आणि समाजाच्या हिताची आहे असे वाटत नाही. सर्वांना समान न्याय व संधी देण्याची शपथ मंत्री होत असताना घेतली, मात्र, अशा निर्णयामुळे सत्तेतील लोकांचे वागणे शपथेशी सुसंगत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडण्ाुकीपूर्वी चारशे पारचा नारा दिला. काय वाट्टेल ते बोलतात. स्वातंत्र्यासाठी १३ वर्षे तुरूंगवास भोगलेल्या पंडित नेहरूपासून इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर टीका केली जाते. राहूल गांधीसारखा तरूण कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत सामान्यांशी संवाद साधून अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो अशा नेतृत्वावर हल्ला करण्याची प्रवृत्ती देश हिताची वाटत नाही.

म्हणून आम्ही एकत्र येउन बदल करण्याचा आणि नव्या पिढीच्या हाती सत्ता सोपविण्याचा निर्णय घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये रोहिेत पाटील या तरूण नेतृत्वाला साथ दिली तर तुमचे प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी आमची राहील याची ग्वाही या निमित्ताने खा.पवार यांनी दिली.

यावेळी युवा रोहित पाटील म्हणाले, स्व. आरआर आबांनी कवठेमहांकाळ सारख्या दुष्काळी भागाचा कॅलिफोर्निया करण्याचा शब्द इथल्या जनतेला दिला होता. तो शब्द पूर्ण केल्या शिवाय मी गप्प बसणार नाही.

Leave a Comment