शरद पवार : विकासासाठी पक्ष सोडला म्हणणे चूक…

Photo of author

By Sandhya

शरद पवार

काही लोक राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो असे सांगत आहेत. मात्र, त्यांचा दावा सत्य नाही. काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असे म्हणणे चूक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलच्या वतीने (शरदचंद्र पवार) राबविण्यात येणार्‍या ‘शरदचंद्र पवार संजीवनी आरोग्य मित्र अभियाना’चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जगन्नाथ शेवाळे, आमदार रोहित पवार, माजी आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड, ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, पक्षाच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनील जगताप आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, आज देशात कोणीही भाजपच्या विचाराच्या विरोधात भूमिका घेतली की, त्याच्याविरोधात सत्तेचा गैरवापर केला जाते. यापूर्वी महाराष्ट्रात ईडी हा शब्द कोणाला माहिती नव्हता. 2014 ते 2023 या काळात ईडीकडून सहा हजार केसेस नोंदवल्या गेल्या. चौकशीनंतर त्यापैकी 25 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आले.

त्यापैकी फक्त दोघांना शिक्षा झाली. ईडीच्या या सगळ्या कामासाठी 404 कोटी रुपये खर्च झाल्याचे पवार यांनी सांगितले. अनेक नेत्यांच्या चौकशी झाल्या, यापैकी 85% नेते हे विरोधी पक्षातील आहेत. भाजपच्या काळात 121 नेत्यांवर ईडीची कारवाई झाली, परंतु कारवाई झालेल्या लोकांमध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नसल्याचे पवार यांनी सांगितले.

बारामतीचे लोक समंजस ’लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बारामतीत जे येतील त्यांचे स्वागतच आहे. बारामतीकर सरळ, साधे, समंजस आहेत. ते योग्य निर्णय घेतील,’ असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) डॉक्टर सेलच्या कार्यक्रमासाठी पवार आले होते. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत सभा झाली होती. या सभेत त्यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ’मी लोकसभेसाठी जो उमेदवार देईल, त्यालाच मतदान करा.

काही लोक शेवटची निवडणूक असल्याचे सांगून भावनिक करतील, त्याकडे लक्ष देऊ नका. लोकसभा निवडणुकीला मी उभा आहे, असे समजून मतदान करा,’ असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पवार म्हणाले, मी निवडणुकीला उभा राहणार नाही, हे मी यापूर्वीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे भावनिक बोलण्याचा प्रश्न येत नाही. बारामतीचे लोक शहाणे आणि समजूतदार आहेत. वर्षानुवर्ष कोणी काम केले आणि त्यांची प्रतिष्ठा वाढविली, हे बारामतीकरांनी पाहिलेले आहे. त्यामुळे तेच योग्य निर्णय घेतील, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.

आमचा पक्ष दुसर्‍याला दिला आमचा पक्ष दुसर्‍याला दिला. पक्षाची उभारणी करणार्‍यांच्या हातून पक्ष काढून घेऊन दुसर्‍याला देण्यात आला, असे देशात कधी घडले नव्हते. ते निवडणूक आयोगाने करून दाखवले. लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाहीत, अशी माझी खात्री आहे, अशी भावनाही पवार यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page