राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भर पवासात सभा घेतली. यावेळी त्यांनी पावसातील ही सभा महाविकास आघाडीच्या भविष्यातील विजयाचे द्योतक असल्याचा दावा केला. मी भाषण सुरू केले की पाऊस पडतो आणि त्यानंतर निकालही चांगला लागतो, असे ते यासंबंधी म्हणाले.
शरद पवार यांच्या शुक्रवारी सांगली व कोल्हापूर पट्ट्यात सभा झाल्या. त्यांनी सकाळच्या सत्रात सांगलीच्या तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. त्यानंतर दुपारी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. पण या सभेत अचानक पाऊस सुरू झाला. यामुळे ही सभा अवघ्या 10 मिनिटांतच उरकण्यात आली.
यावेळी पवार पुढे म्हणाले की, ही निवडणूक महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणारी आहे. त्यात माझा, जाहीर सभेचा व पावसाचा काहीतरी संबंध आहे. महाराष्ट्रात अनेकदा मी बोलण्यास उभे टाकलो की पावसाला सुरूवात होते. आणि त्या परिस्थितीत मी बोलल्यानंतर निवडणुकीचा निकाल चांगला लागतो.
मध्यंतरी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. आता विधानसभेची होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा याचा निकाल आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. आपण 5 वर्षांपूर्वी ज्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता दिली, त्यांचा अनुभव पाहिला तर सत्तेत बदल केल्याशिवाय आपल्यापुढे कोणताही पर्याय नाही.
आणि सत्तेत बदल करायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी करून सरकार बनवण्याचे ऐतिहासिक काम करावे लागणार आहे. तुम्ही भर पावसात या ठिकाणी आलात, आमची भूमिका समजून घेण्याची तयारी दर्शवली त्याविषयी तुमचे आभार मानतो, असे शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्र फडणवीसांच्या हातात जाऊ देणार नाही
तासगाव येथील सभेत राज्याच्या राजकारणात काहीही झाले तरी चालेल, पण महाराष्ट्राची सत्ता देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या घटकांच्या हातात जाऊ द्यायची नाही. आम्ही या निवडणुकीत केवळ जिंकण्यासाठी नव्हे तर काम करण्यासाठी मते मागत आहोत. आमच्याकडे ठोस कार्यक्रम आहे. त्यावर मतदारांनी मतदान करावे असा आमचा आग्रह आहे, असे ते म्हणाले.