शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आधीच आपली बाजू भक्कम करून ठेवली ?

Photo of author

By Sandhya

शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आधीच आपली बाजू भक्कम करून ठेवली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीच्या घटनेपासून धडा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आधीच आपली बाजू भक्कम करून ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

यामुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्ष ताब्यात घेण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकवित एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी केली आहे.

एवढेच नव्हे तर, शिंदे यांच्याप्रमाणे आपलाच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष खरा असल्याचा दावा केला आहे. मात्र, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील पक्षच खरा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहे.

यामुळे, अजित पवार यांनी पक्षावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला आणि तसा दावा केला असला तरी कायद्याच्या माध्यमातून ही बाब त्यांना सिध्द करता येणार नाही. यामुळे, अजित पवार यांना तारेवरची अवघड कसरत करावी लागणार आहे.

श्रीवास्तव यांनी सांगितले की, देशभरातील तमाम विरोधी पक्षांची वज्रमूठ दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाली आहे. विरोधी ऐक्‍याची ताकद कमी झाली नाही तर 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीत आपला निभाव लागणार नाही, हेही मोदी यांना कळून चुकले आहे.

म्हणूनच भाजप विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आली तशी वेळ आपल्यावरही येवू शकते याचा अंदाज बांधून शरद पवार यांनी आधीच सर्व बंदोबस्त करून ठेवला आहे. 2022 च्या सप्टेबर महिन्यात शरद पवार यांची पक्षाध्यक्षपदी पुढील तीन वर्षांसाठी एकमताने निवड करण्यात आली होती.

Leave a Comment

You cannot copy content of this page