“शरद पवार हे फार हुशार व्यक्ती असून, ते पंतप्रधान असते तर जनतेची चांगली सेवा करू शकले असते. त्यांना दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी होती.
मात्र, त्यांनी ती घालविली. यामुळे आता वयाचा विचार करून त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे, असे मला वाटते,’ अशा भावना पवार यांचे निकटवर्तीय तसेच सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी व्यक्त केल्या आहेत.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना पूनावाला यांनी पवारांच्या निवृत्तीवर आपले मत व्यक्त केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शरद पवारांच्या भूमिकेशी फारकत घेत सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
“शरद पवारांचे वय झाल्याने कुठेतरी थांबायला हवे,’ याबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा पूनावाला यांच्या विधानामुळे पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, यावेळी अजित पवारांच्या भूमिकेबाबत पूनावाला यांनी बोलणे टाळल्याचे दिसून आले.