ओबीसी आणि मराठा यांचे ताट वेगळे असले पाहिजे. आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसीमध्ये कोणी येणार असेल तर त्याला आमचा विरोध असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ओबीसी आरक्षण बचाव यात्रा जिल्ह्यातील विविध शहरांत गेली. गुरुवारी गेवराई आणि वडवणीत त्यांनी मार्गदर्शन केले. आरक्षणाचा वाद हा राजकारणापुरताच राहिला पाहिजे.
परंतु तो आता सामाजिक द्वेषापर्यंत जात आहे. आरक्षण देण्याचा अधिकार हा सरकारचा आहे व ते बरोबर आहे का नाही? हे तपासण्यासाठी न्यायालय आहे. त्यामुळे आपण सामाजिक सलोखा बिघडवू नये, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी केले.
कोणीही विखरून न राहता ओबीसी म्हणून एकत्र येऊन सरकारला धडकी भरवली पाहिजे तरच सरकार नीट होईल, असेही ते म्हणाले. या यात्रेचा समारोप ७ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे.
शरद पवारांना दंगल घडवायची आहे का? राज्यात मणिपूरसारखी स्थिती होऊ शकते असे म्हणून शरद पवारांना दंगल घडवायची आहे का? प्रत्येक जातीचे नेते समाजाची ताकद दाखवतात पण तुमची राजकीय ताकद कुठे आहे? असा सवालही ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केला. शरद पवारांना ओबीसी-मराठा आरक्षण वाद पेटता ठेवून निवडणूक लढवायची आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष घराणेशाहीचा वारसा निर्माण करणारे पक्ष आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाने जागे होऊन विधानसभा निवडणुकीत ओबीसींचे १०० आमदार निवडून येतील याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.