शिंदे-फडणवीस सरकारने त्वरीत राजीनामा दिला पाहिजे आणि नवं सरकार गठन केलं पाहिजे

Photo of author

By Sandhya

सुप्रीम कोर्टाने आज शिंदे गट पक्षावर दावा करू शकत नाही. तसेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे मत नोंदविले आहे. संवैधानिक पदावर असलेल्या राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांवर ओढलेल्या ताशेऱ्यावरून हे सरकार बेकायदा पद्धतीने अस्तित्त्वात आले आहे, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून दिसतो.

यामुळे सुप्रीम कोर्टाने ओढलेले ताशेरे गंभीर स्वरूपाचे आहेत. म्हणूनच सद्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने नैतिकतेच्या आधारावर तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी ठोस मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण ही चूक होती. त्यांनी फ्लोअर टेस्टचा सामना करायला हवा होता, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच काही वेळात दिले होते.

यापुढे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कायदेशीर रित्या उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण चूक असली, तरी नैतिकता जपणाऱ्या उद्धव ठाकरेंनी त्यावेळी राजीनामा दिला.

ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सरकार अस्तित्त्वात आले, त्यानंतर जो घोडाबाजार झाल्याचे पाहता हे सरकार बेकायदा, असंवैधानिक आहे. याकरता पुढची न्यायालयीन कारवाई निश्‍चितच केली जाईल.

माझी या ठिकाणी मागणी आहे की, न्यायालयाने इतके गंभीर ताशेरे संवैधानिक पदावर बसलेल्या लोकांवर ओढले आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे. न्यायालयीन झगडे, कोर्ट-कचेऱ्या वाचवण्याकरता नैतिकतेच्या आधारावर शिंदे-फडणवीस सरकारने त्वरीत राजीनामा दिला पाहिजे आणि नवं सरकार महाराष्ट्रामध्ये गठन केलं पाहिजे.

Leave a Comment

You cannot copy content of this page