आमदार अपात्रता याचिकांवर आठवडाभरात सुनावणी घेत वेळापत्रक निश्चित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी विधान भवनात पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होत आहे.
विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी तीन वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होईल. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ३९ तर ठाकरे गटाच्या १४ अशा एकूण ५३ आमदारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी पहिली सुनावणी घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविल्यानंतर सुमारे पाच महिन्यांनंतर १४ सप्टेंबर रोजी पहिली सुनावणी झाली.
या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या याचिका मिळाल्या नसल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. त्यामुळे कागदपत्रे एकमेकांना सुपूर्द करण्यासाठी तसेच या याचिकांच्या अभ्यासासाठी वेळ देत अध्यक्षांनी पुढील सुनावणीची तारीख १७ दिवसानंतरची निश्चित केली होती.
मात्र दरम्यानच्या काळात तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी लवादाप्रमाणे कार्यवाही करावी.
आठवडाभरात सुनावणी घेत दोन आठवड्यांत सुनावणीची पुढील रूपरेषा, कार्यक्रम निश्चित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सोमवारी विधान भवनात तातडीने सुनावणीला सुरुवात होणार आहे.