धक्कादायक! फुरसुंगी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Photo of author

By Sandhya

फुरसुंगी(पुणे) : पुणे सासवड मार्गावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली होती. ही घटना फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वांजळे मळा परिसरात असलेल्या गावकरी हॉटेल जवळ शुक्रवारी (ता.29) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारस घडली होती. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दुर्गेश देविदास चोरघडे (वय 18, रा. वडकी, ता. हवेली) व देशराज बलवंत सारीवान (वय 21, रा. खन्नात मॉल, पोस्ट रैतवर, ता. बजाक जिल्हा बजाक, राज्य मध्यप्रदेश) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी विलास सोमनाथ काळभोर (वय 60, रा. बाजारमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सारीवान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विलास काळभोर हे लोणी काळभोर येथे कुटुंबासोबत राहतात. तर शेवाळवाडी येथे ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतात. विलास काळभोर व त्यांचे मित्र काशीनाथ कांबळे हे दोघे दुचाकीवरून सासवडला कामानिनित्त शुक्रवारी (ता.29) गेले होते. तेथील काम आटोपून ते दोघे दुचाकीवरून माघारी चालले होते.

दरम्यान, सासवड पुणे मार्गावरून जात असताना, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी वडकी रस्त्यावरील वांजळेमळा परिसरात असलेल्या गावकरी हॉटेल जवळ आली असता, देशराज सारीवान हा चालवीत असलेल्या दुचाकीने समोरासमोर काळभोर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकी चालवीत असलेला देशराज सारीवान व त्याच्या दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या त्याचा मित्र दुर्गेश चोरघडे हे दोघे गंभीर जखमी झाले होते. तर काळभोर हे किरकोळ जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेले देशराज सारीवान व दुर्गेश चोरघडे यांना नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

देशराज सारीवान याने त्याच्या ताब्यातील दुचाकी ही वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगाने चालविले आहे. तसेच काळभोर यांच्या मोटार सायकलला समोरून धडक दिली आहे. या अपघातात त्याच्या व दुर्गेश चोरघडे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. अशी फिर्याद विलास काळभोर यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्यानुसार सारीवान याच्या विरोधात अपघातात कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता कलम, 106 (1), 125 (अ) व 279 मोटर वाहन कायदा कलम 134 (अ) (ब) , 119/177,184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.

Leave a Comment