आंबेगांव : पौंष पौर्णिमेला श्री म्हाळसाकांत खंडोबा व म्हाळसाई देवीचा सोहळा धामणी ( तालुका आंबेगांव)येथे पारंपारिक वाद्याच्या गजरात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत शाही थाटात पार पडला.सोमवारी (दिं.१३) पौष पौर्णिमेनिमित्त पहाटे धामणीच्या खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती करण्यात आली त्यानंतर सेवेकरी व महिला भाविकांनी स्वयंभू सप्तशिवलिंगाला व सर्वांगसुंदर खंडोबा व म्हाळसाईच्या मुखवट्याला चंदन उटीचा लेप दिला व त्यावर सुंगधी दवणाच्या अत्तरात मिश्रित केलेली हळद लावण्यात आली.यावेळी देवाला हळद लावण्यासाठी महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.यावेळी महाळुंगे पडवळ.गावडेवाडी.लांडेवाडी.तळेगांव ढमढेरे.लोणी.खडकवाडी.रानमळा. पाबळ.अवसरी खुर्द.संविदणे येथील मानकरी व भाविक उपस्थित होते.सकाळी दहा वाजता बाळासाहेब महादू बढेकर.विठ्ठल बढेकर.अंकुश बढेकर यांच्या मानाच्या मांडवडहाळ्याची पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात येऊन सजवलेल्या बैलगाड्यातील मांडवडहाळे मंदिरात सदानंदाचा येळकोट करून व भंडार्याची उधळण करुन देवाला अर्पण करण्यात आले.श्री म्हाळसाकांत खंडोबा व म्हाळसाईदेवी यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली होती मंदिरात देवाला पूजा करुन खंडोबाला व म्हाळसाईच्या देखण्या मूर्तीला बांशिग व मुडावळ्या घालण्यात आल्या.पेठेतील मुक्ताबाई मंदिरात पौष महिण्याच्या पालखीचे मानकरी समस्त करंजखेले मंडळीच्या हस्ते आरती करण्यात आल्यानंतर दुपारी सेवेकरी मंडळीनी मंदिरातील पंचधातूच्या खंडोबाच्या मुखवट्याला बाशींग व मुडावळ्या बांधून मुखवटा पालखीत ठेवल्यानंतर पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूकीला सुरुवात झाली.पौष महिण्यातील शाकंभरी पौंष पौर्णिमेच्या पालखीचा पारंपारिक मान समस्त करंजखेले मळ्याला असतो.मिरवणूकीत करंजखेले.कदम.करंडे.सांडभोर.वाळूंज आडनावाचे भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झालेले होते.महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.मिरवणूकीत महिलांनी फुगडी खेळून मिरवणूकीला रंगत आणली.मिरवणूकीत खंडोबाचे वाहन असलेला रुबाबदार अश्व (घोडा)सामील झालेला होता.यावेळी मिरवणूकीत पालखीवर फुलाच्या पाकळ्या.अक्षदा व भंडारा उधळण्यात येत होता.फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.पालखीची मिरवणूक सायंकाळी पावणेपांच वाजता मंदिरात विसावली.मंदिराच्या आवारात देवाच्या लग्न सोहळ्यासाठी आकर्षक मंडपातील सजवलेल्या स्टेजवर नवरदेव म्हाळसाकांत खंडोबाचे महिलांनी ओवाळणी करुन स्वागत केले त्यानंतर सनई व तुतारीच्या निनादात खंडोबाचा मुखवटा स्टेजवर आणण्यात आला.त्यानंतर सेवेकरी मंडळीनी मुख्य मंदिरातून बांशिंग व मुडावळ्या घातलेल्या व हिरवी साडी परिधान केलेला म्हाळसाईचा मुखवटा मंडपात आणला.मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून हजारो वर्हाडी मंडळीच्या उपस्थितीत सांयकाळी ५ वाजता खंडोबा म्हाळसाईच्या विवाह सोहळ्याला सुरुवात झाली पांच मंगलाष्टकाच्या गजरात फुलांच्या पाकळ्या व अक्षता भंडारा उधळून वाद्याच्या निनादात व फटाक्याच्या आतषबाजीत सदानंदाचा येळकोट करुन खंडोबा म्हाळसाईचा विवाह सोहळा पार पडला.त्यानंतर उपस्थित वर्हाडी मंडळीना मोतीचूर लाडूचा प्रसाद देण्यात आला चौकट विलोभनीय लग्न सोहळा !…. पौष पौर्णिमेला होणारा खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा विवाहदिनाची आठवण जागवणारा भावुक व आनंदी सोहळा सणासारखा साजरा करण्यात येतो.हा एक लोकोत्सव आहे पिढी दरपिढी चालत आलेल्या रितीरिवाजाप्रमाणे हा लग्न सोहळा पाल (ता कराड सातारा) येथे व ठिकठिकाणच्या खंडोबा मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.आपल्या लोकसंस्कृतीचा जवळून परिचय व्हावा म्हणून प्रत्येकांने एकदा तरी या पौष पौर्णिमेच्या खंडोबा म्हाळसा या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून हे देवकार्य बघावे असा हा विलोभनीय क्षणाचा लग्न सोहळा धामणी ग्रामस्थांनी साजरा करून पूर्वापांर परंपरेचे जतन करत असल्याचे कौतुक वेदाचार्य वामन बाळकृष्ण मरकळे आळंदीकर यांनी यावेळी सांगितले.