म्हसवड येथील एका खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी करण्याकरता आलेल्या रुग्णाच्या गळ्यातील सुमारे दीड लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून रुग्णालयातील चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील बोंबेवाडी (ता. आटपाडी) येथील संभाजी गणपत पवार हे म्हसवड येथील एका खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी रूग्णालय व्यवस्थापनाकडे सोनोग्राफी करायची असल्याचे सांगितले. त्यानुसार सोनोग्राफीही करण्यात आली.
त्यादरम्यानच त्यांच्या गळ्यात असणारी सुमारे दीड लाख रुपये किंमतीची ३० ग्रॅम सोन्याची सोनसाखळी अज्ञाताने चोरून नेली. त्याची तक्रार संभाजी पवार यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत चोरट्याचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास सपोनि राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी जाधव हे करत आहेत.