State government approves the post of Additional District Collector in Baramati

प्रशासकीय,महसुल विषयक कामांना मिळणार वेग
बारामती – पुणे जिल्ह्यात वाढत चाललेल्या प्रशासकीय कामकाजाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने बारामती येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी पद निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे.या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे बारामती तालुक्यासह इतर गावांतील महसुल विषयक व इतर प्रशासकीय कामांना गती मिळेल अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त होत आहे.पुणे जिल्ह्याची वाढलेली लोकसंख्या, औद्योगिक विस्तार व बारामतीतील विविध विकास कामाचा व्याप लक्षणीय वाढलेला आहे.बारामती,इंदापूर,दौंड,पुरंदर या तालुक्यांमध्ये प्रशासकीय प्रकरणांची संख्या वाढत असल्याने स्थानिक पातळीवर म्हणजेच बारामतीत स्वतंत्र अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमणूक करण्याची मागणी केली जात असल्याने त्याचा शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.अखेर राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी देत बारामती येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी पदास हिरवा कंदील दिला आहे. या नव्या कार्यालयामुळे महसुलविषयक कामे, जमीनीविषयक कामे, अपील प्रकरणे,निवडणूक प्रक्रिया आणि इतर शासकीय कार्यवाही प्रकरणे अधिक वेगाने पार पाडता येणार आहे. नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे येथे जाण्याची गरज कमी होणार आहे.पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे निर्माण करण्याचा विचार होता. मात्र सध्या बारामतीलाच मंजुरी मिळाली आहे.या निर्णयामुळे बारामतीच्या प्रशासकीय कामकाजाच्या महत्त्वात वाढ झाली असून स्थानिक स्तरावर समाधान व्यक्त होत आहे.या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लवकरच या पदाची अधिकृत नियुक्ती होणार आहे व त्यानंतर प्रशासकीय कार्यालयीन कामकाजास औपचारिक सुरुवात होणार आहे.