महायुतीच्या नेत्यांची धडपड, फैसला आज….

Photo of author

By Sandhya

महायुतीच्या नेत्यांची धडपड, फैसला आज

महायुतीतील बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी प्रचंड धडपड चालविली असून त्याचा काय परिणाम होतो हे सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.  

पुणे, मराठवाडा आणि विदर्भात भाजपच्या बंडखोरांनी पक्षाची डोकेदुखी वाढविली आहे. मात्र, आमचे ९० टक्के बंडखोर माघार घेतील असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.शिंदेसेनेविरोधात भाजपचे ९ बंडखोर मैदानात आहेत. तर भाजपविरोधात शिंदेसेनेच्या ९ जणांनी अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादीविरोधात शिंदे गटातील ७ जणांनी अर्ज भरलेत.

आर्वीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती सुमित वानखेडे यांच्याविरुद्ध बंड करणारे आ. दादाराव केचे यांनी माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्याआधी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे त्यांना घेऊन अहमदाबादला गेले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घडवून आणली.

मुंबईच्या बोरीवलीत माजी खासदार गोपाळ शेट्टी हे सोमवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी त्यांच्याशी चर्चा करून मन वळविण्याचा प्रयत्न केला. मी पक्ष सोडणार नाही, मी पक्षाचे नुकसानही करणार नाही असा शब्द शेट्टी यांनी दिला असल्याचा दावा तावडे यांनी एक्सवरून केला. पण आपण लढणार असल्याचे म्हणत शेट्टी यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.

Leave a Comment