Successful mock drill of countering terrorist attack at Shri Mayureshwar Temple, Morgaon







सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील श्री. मयुरेश्वर मंदिर,मोरगाव येथे आज दिनांक ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत मंदिराच्या सुरक्षेसाठी दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिकाराची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) यशस्वीपणे पार पडली.ही तालीम मंदिरातील भाविकांची सुरक्षितता व संरक्षण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती.
या रंगीत तालीमेत सुपा पोलीस स्टेशन मधील २ अधिकारी व ९ पोलीस अंमलदार,दहशतवादी विरोधी पथकाचे (ATS) १ अधिकारी व ७ पोलीस अंमलदार,क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) चे ९ पोलीस अंमलदार तसेच बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोझल स्क्वॉड (BDDS) पुणे ग्रामीणमधील १ अधिकारी व ६ पोलीस अंमलदार व होमगार्ड पथकातील जवान सहभागी झाले होते.एकूण ४४ जणांच्या सहभागाने ही तालीम अत्यंत समन्वयपूर्ण व प्रभावीपणे पार पडली.
मॉक ड्रिल दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या काल्पनिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व पथकांनी त्वरित प्रतिसाद देत संभाव्य धोका हाणून पाडण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. BDDS पथकाने संशयित स्फोटक वस्तू शोधून नष्ट करण्याचे प्रदर्शन केले,तर ATS व QRT पथकांनी हल्लेखोरांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.
सदर रंगीत तालीमेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होईल. भाविक व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षितते साठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असून भाविक व नागरिकांनी संशयित वर्तन करणारी व्यक्ती किवा वस्तु दिसल्यास तात्काळ ११२ किंवा स्थानिक पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी केले.
सदरची रंगीत तालीम कारवाई संदिपसिंह गिल्ल,पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण,गणेश बिरादार,अपर पोलीस अधीक्षक,बारामती व सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे (सुपा पो.स्टे), सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार (एटीबी शाखा),पोलीस उप निरीक्षक सुरेश गिते (बीडीडीएस शाखा), पोलीस अंमलदार व होमगार्ड पथकातील जवान यांनी पार पाडली.