सुधीर मुनगंटीवार : मधनिर्मितीत लवकरच महाराष्ट्र अग्रेसर ठरेल…

Photo of author

By Sandhya

सुधीर मुनगंटीवार

सध्या महाराष्ट्र मधनिर्मितीत १८ व्या स्थानावर आहे, मात्र राज्यात मध निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. येत्या काळात महाराष्ट्र मध निर्मितीत पहिल्या क्रमांकावर यावा अशी अपेक्षा आहे,

देशातील पहिल्याच अशा आगळ्या वेगळ्या मध महोत्सवाच्या माध्यमातून राज्य भविष्यात मध निर्मितीचा हब होईल यासाठी कौशल्य विकास, प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि मध विकत घेण्याची हमी अशी एकात्मिक योजना गावागावात राबवावी, असे मत वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

मधमाशापालन,मध निर्मिती,मधमाशांबाबतचे गैरसमज याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १८ आणि १९ जानेवारी रोजी मध महोत्सवाचे आयोजन खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

यावेळी ते बोलत होते. ज्या गावांमध्ये मधुमक्षिका पालन केले जाते त्या ठिकाणी शेतीच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ झाल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मध आपल्या जीवनात गोडवा निर्माण करतेच पण तिजोरीत सुद्धा भर घालते. तसेच शासन सुद्धा मध निर्मितीसाठी निधी कमी पडू देणार नाही याची मला खात्री आहे.

राज्याला मधनिर्मितीत पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वसमावेशक अशी उत्तम योजना तयार करावी, यासाठी शासनाकडून निधी कमी पडणार नाही, असे मुनंगटीवार यांनी अधोरेखित केले.

या महोत्सवाची प्रस्तावना उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी मांडली. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, केंद्रिय खादी व ग्रामोद्योग आयोगाचे संचालक योगेश भामरे, उद्योग विभागाचे उपसचिव श्रीकांत पूलकुंडवार, सहसचिव लक्ष्मीकांत ढोके उपस्थित होते.

या महोत्सवातून नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांनी मधमाशीच्या जगाचे, जीवन प्रवासाचे आणि तिच्या उपयुक्ततेचे ज्ञान आत्मसात करावे. शिस्तस्तबद्ध जीवन कसे जगावे याचा धडा मधमाशीच्या कार्यातून मिळतो असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रगतिशील मधपाळ सन्मानाने शेतकरी, सरपंच व गावांचा सन्मान करण्यात आला. लवकरच मधमाशीचे विष संकलन मधमाशी पालनातून रोजगार, पिक उत्पादनात वाढ शरीराचे पोषण आणि आरोग्य अशा सर्वच बाबी मधमाशी देते.

त्यामुळे गाव तिथे मधपेटी, प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण, मधाची गावे तयार करणे, शेतक-यांप्रमाणेच महिला बचत गटांना यात गुंतवणे आदी बाबी खादी ग्रामोद्योग मंडळ येत्या काळात राबवणार आहे.

त्याचबरोबर मधमाशीच्या विषाला सुद्धा मोठी मागणी आहे. त्यामुळे ‘मधमाशीचे विष संकलन’ हा ड्रीम प्रोजेक्ट राबविणार आहे – रविंद्र साठे, महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती

Leave a Comment

You cannot copy content of this page