सुप्रिया सुळे : बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करा

Photo of author

By Sandhya

 सुप्रिया सुळे

टंचाईची भीषण स्थिती विचारात घेता बारामती लोकसभा मतदारसंघात चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ही मागणी केली आहे.

यंदा नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शासनाने तातडीने टंचाईचा आढावा घ्यावा, असे त्यांनी नमूद केले आहे.

खासदारांना सुळे यांनी याबाबत ट्विट केले, असून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांना टॅग करत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना पशुधन जगवावे कसे याची चिंता आहे. पिण्याच्या पाण्याची देखील मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशांना भटकण्याची वेळ आलीय. आणखी उन्हाळा सुरू व्हायचा आहे, तोवरच ही परिस्थिती असून ती पुढील काही दिवसांत आणखी भीषण होऊ शकते, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

शासनाला ही सर्व परिस्थिती दिसत असूनही त्यावर योग्य ती उपाययोजना होताना दिसत नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे, असे सांगत सुळे यांनी, ‘नागरिकांना होणारा त्रास बघूनही शासन शांत कसे बसू शकते याचे आश्चर्य वाटते’, असे नमूद केले आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी बारामती लोकसभा मतदारसंघातील टंचाईचा आढावा घेऊन तातडीने चारा छावण्या आणि पाण्याचे टॅंकर सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page