सुप्रिया सुळे : छत्रपतींचा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदाराकडे…

Photo of author

By Sandhya

सुप्रिया सुळे

नौदलदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

विरोधकांनीही या घटनेवरून महायुती सरकारला टार्गेट केले आहे. तर हा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदारांकडे होते त्याला काळ्या यादीत टाका अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

याबाबत सुप्रिया सुळेंनी ट्विट करत वर्क ऑर्डर पोस्ट केली आहे. त्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते.

त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी आमची मागणी आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे.

विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पूर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे.

या अर्थाने ही प्रधानमंत्री आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

Leave a Comment