वर्ध्याच्या आर्वी येथे जाहीर सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलीच टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटींचा आरोप केला. त्या आरोपाची फाईल दाखवल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात. आम्ही अजित पवार यांच्यावर आरोप केले नाही.
अजित पवार यांची चौकशी देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाने लावली. देवेंद्र फडणवीस यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे सांगितले होते. तुम्ही आरोप केले त्यांना फाईल कशी दाखवली?, असा प्रश्न उपस्थित करून निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध तक्रार करणार असल्याचा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.
आर्वी येथे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार मयुरा काळे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार अमर काळे, मयुरा काळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
उभ आयुष्य महाराष्ट्रातील आणि देशाच्या जनतेसाठी अर्पण करायचं, असे सांगत त्यात मला कुटुंबाची, जनतेची साथ मिळाली. त्यामुळे हे मी करू शकते. महिला निर्णय प्रक्रियेत येतात, तेव्हा क्रांती होते. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, असे सांगत ईडीच्या जोरावर यांची सत्ता येते, अशीही टीका केली. इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडीच्या जोरावर पक्ष फोडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सर्वात सक्षम गृहमंत्री आर. आर. आबा होते, असेही त्या म्हणाल्या.
राज्यात महागाई, बेरोजगार, भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत. या सरकारने महागाई वाढवून ठेवली आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कार्जमाफी करणार, असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.