उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारबद्दल केलेल्या एका विधानावरून खासदार सुप्रिया सुळेंनी महायुतीवर निशाणा साधला आहे. महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवर अनेकदा विरोधकांकडून टीका केली जाते.
यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे. फडणवीस यांच्या विधानाचा व्हिडीओ पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सुप्रिया सुळेंची पोस्ट
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “चला बरं झालं, स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनीच सांगून टाकलं की त्यांच्या सरकारचा वेग गोगलगायीचा आहे. या सरकारमध्ये फाईल पुढे जाण्यासाठी धक्का मारावा लागतो असंही त्यांनी कबूल केलेय.
थोडक्यात महायुतीच्या काळात प्रशासन गतीमान वगैरे सांगणाऱ्या जाहिराती साफ खोट्या आहेत याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय? थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले द्रष्टेपणाने म्हणालेच होते – ‘विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।’
पुढे त्या म्हणाल्या, “खोकेबाजीच्या अविद्येचे एवढे सगळे प्रताप झाले. या खोकेबाजीमुळे या सरकारची मती गेली, मती गेली म्हणून नीती गेली, नीती गेली म्हणून गती गेली, गती गेली म्हणून उद्योग परराज्यात जाऊ लागले म्हणजेच वित्त गेले.
वित्त नाही म्हणून शेतकरी, गोरगरीब, शोषित, वंचितांच्या हक्काचं हे सरकार देऊ शकत नाही…. तात्पर्य काय तर महायुतीचे हे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? “आमच्या सरकारमध्ये जी फाईल असते ती गोगलगायीच्याच पावलाने पुढे जाते, तिला धक्काच मारावा लागतो. धक्का मारल्याशिवाय काहीच पुढे जात नाहीत,” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.