सुप्रिया सुळे : ज्यांनी पक्ष स्थापन केले, त्यांचे पक्ष अन् चिन्ह पळवले गेले, आमचा न्यायदेवतेवर विश्वास…

Photo of author

By Sandhya

सुप्रिया सुळे

ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर झालेला अन्याय जनतेने पाहिला आहे; पण न्यायदेवता योग्य निर्णय देईल. राष्ट्रवादी व शिवसेना पक्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ज्यांनी पक्ष स्थापन केले, त्यांचे पक्ष आणि चिन्ह पळवले गेले आहे. आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास असून योग्य निर्णय होईल.

न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. सत्य परेशान हो सकता है पराजित नही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी न्यायदेवतेवरील विश्वास व्यक्त केला.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी टिळकांनी शोधली, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा सुळे यांनी समाचार घेतला. भाजप व त्यांच्याशी संबंधित लोक इतिहास बदलू पाहत आहेत.

फडणवीस यांनी सुरतबद्दल असेच वक्तव्य केले होते. इतिहास अभ्यासक वस्तुस्थिती मांडत आहेत. छत्रपतींचा मान-सन्मान झालाच पाहिजे; परंतु भाजपकडून छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडला जात आहे. त्याला आम्ही कडाडून विरोध करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

राज्यात हिट ॲण्ड रन, महिला अत्याचार वाढले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यात ट्रिपल इंजिन खोके सरकार अपयशी ठरल्याची टीका सुळे यांनी केली. मणिपूरप्रश्नी केंद्र सरकार ‘फेल’ गेले आहे.

पक्षभेद विसरून आपण तेथे जाऊ, तेथील महिला, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करू, अशी मागणी मी पंतप्रधानांकडे केली. दुर्दैवाने तेथील हिंसा थांबत नसून केंद्र त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा निशाणा त्यांनी साधला.

राज्याभरातील लोक शरद पवार यांना बारामतीत भेटत आहेत. ही गेल्या सहा दशकांतील कामाची पावती आहे. दिल्लीत पवार व नितीन गडकरी ही दोन हक्काची आपली माणसे आहेत, असेही त्या एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाल्या. विधानसभेसंबंधी येणाऱ्या सर्व्हेवर बहुत जल्दबाजी होगी, असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य करणे खासदार सुप्रिया सुळे यांनी टाळले. 

Leave a Comment

You cannot copy content of this page