मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि.१) केली आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
सुळे म्हणाल्या की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे -पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे.
त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, साखळी उपोषण सुरू झाले आहे. तर काही ठिकाणी जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्याची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
यासाठी राज्याचे गृहमंत्री फडणवीस जबाबदार आहेत, असा आरोप करून त्यांनी राजीनामा द्यावा. मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊन विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आपण याआधी केली होती.
मराठा, धनगर आरक्षणाबाबत आपण वेळोवेळी आवाज उठविला आहे. सत्तेतील आमदारांनाच आता सरकारवर विश्वास राहिलेला नाही. राज्यात लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानांना लक्ष्य करण्यात आल्याने तणावाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपपासून धोका असल्याचा दावाही सुळे यांनी यावेळी केला.