‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘फेक नॅरेटिव्ह’चे चालते बोलते केंद्र आहेत,’’ अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
अंधारे म्हणाल्या, ‘‘फडणवीस यांचे भाजप अधिवेशनातील भाषण फेक नॅरेटिव्हचे केंद्र किती मोठे असू शकते याचा धडधडीत पुरावा आहे. भाषणात फडणवीस म्हणाले, ‘ठाकरेंना आरक्षण टिकवता आले नाही.’
जर ठाकरेंना महाराष्ट्रात आरक्षण टिकवता आले नाही असे त्यांचे म्हणणे असेल; तर बिहारमध्ये भाजपचे डबल इंजिनचे सरकार होते; मग त्यांना तेथे आरक्षण का टिकवता आले नाही? महाराष्ट्रात भाजपला आरक्षण द्यायचे नसल्याने ते गोंधळाची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.’’
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत आरक्षणाची कालमर्यादा दहा वर्षांची ठेवली होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आरक्षणाची मर्यादा दहा वर्षांनी वाढली,’ असेही फडणवीस म्हणाले.
त्यावर अंधारे म्हणाल्या, ‘‘माझी अशी समजूत होती की फडणवीस फार हुशार आहेत, ते प्रचंड अभ्यास करतात. त्यांना प्रत्येक गोष्टींची माहिती असते; पण ते निखालसपणे खोटं बोलत होते.’’
अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष, अशी टीका केली. त्यावर अंधारे म्हणाल्या, ‘‘ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग आहेत, शहाबुद्दीन एन्काउंटर प्रकरण आहे, त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. आम्ही कोण आहोत, काय आहोत? याचे प्रमाणपत्र गुजरातच्या तडीपाराकडून घेण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही.’’