प्लॅस्टिक कचरा एकत्रित करणे आणि त्याचे पुन:चक्रीकरण करण्यासाठी प्लॅस्टिक व्यवस्थापन प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. “स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 13 मोठ्या गावांमध्ये प्लॅस्टिक व्यवस्थापन प्रकल्पांची उभारणी करण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेकडून देण्यात आले आहेत.
यामध्ये आंबेगाव तालुक्यात वडगाव काशीबेग, बारामतीमध्ये सांगवी, जुन्नरमध्ये पाडळी बारव, खेडमध्ये शिरोली, मावळात जांभुळ, शिरूरमध्ये तळेगाव ढमढेरे, भोरमध्ये किकवी, दौंडमध्ये यवत, हवेलीत उरुळी कांचन, इंदापुरात निमगाव केतकी, मुळशीत पौड, पुरंदरमध्ये वाल्हा आणि वेल्हा तालुक्यात कुरण खुर्द या गावांत हे प्रकल्प उभारण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
संबंधित प्रकल्प सुरू करण्याचे आदेश मिळाल्यापासून 90 दिवसांत संबंधित ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या जागेतील प्रकल्पस्थळी साहित्य पोहोच करून काम पूर्ण करायचे आहे.
प्रकल्पासाठी आवश्यक यंत्रसामग्री, शेड बांधकामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उभारण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची तपासणी, चाचणी कार्यालयाने दिलेल्या संस्थेकडून करणे बंधनकारक आहे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. हे प्रकल्प संबंधित ग्रामपंचायतींकडून चालविण्यात येणार आहेत. त्याबाबत तसे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.